ट्विटरवर बेधडक व्यक्त व्हायचे ऋषी कपूर, अनेकदा व्हायचा वाद

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झालं. मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर सिनेक्षेत्रातून ही दुसरी दु:खद बातमी समोर आली आहे.





ऋषी कपूर हे ट्विटरवर खूप सक्रिय होते. त्यांच्या ट्वीटची नेहमी चर्चा व्हायची. अनेकदा त्यांनी केलेल्या ट्विटमुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या ट्वीटबाबत प्रकर्षाने उल्लेख केला आहे. एक 'मोकळंढाकळं ट्विट' बंद झालं! असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटरवरुन नेहमी स्पष्ट आणि सडेतोड मत व्यक्त केलं. आपले शेवटचे ट्वीट 2 एप्रिलला केले होते. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना सलाम केला होता. तसंच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांवर हल्ल्यांच्या घटनांवर भाष्य केलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं की, 'सर्व भाऊ-बहिणींना हात जोडून एक आवाहन. कृपया हिंसा, दगडफेक किंवा लिंचिंगचा अवलंब करु नका. डॉक्टर, नर्स, मेडिक्स, पोलिस वगैरे आपले आयुष्य धोक्यात घालून आपले जीव वाचवत आहेत. आपल्याला हे कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध जिंकायचे आहे. जय हिंद!'