नवी दिल्ली : लॉकडाऊन काळात निझामुद्दीन 'तबलीघी जमात' मरकझ समोर आल्यानंतर देशाला हादरा बसला होता. करोनाचा धोका वाढल्यानं मोठा वादही उभा राहिला. परंतु, 'केवळ एका संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या गुन्ह्यासाठी संपूर्ण समाजाकडेच गुन्हेगार म्हणून पाहणं चुकीचं' असल्याचं मत केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलंय. शिवाय रमजानच्या पवित्र महिन्यात संपूर्ण मुस्लीम समुदाय लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना आपल्या घरातच 'इबादत' आणि 'इफ्तार' करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्या संस्थेनं बेजबाबदारपणा दाखवला त्यांची अधिकाधिक निंदा मुस्लिमांकडून करण्यात आली. शिवाय त्यांच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली. त्यामुळेच एका संस्थेच्या चुकीसाठी संपूर्ण समाजाकडेच गुन्हेगार म्हणून पाहिलं जाऊ शकत नाही, असंही मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलं.
...ते मानवतेचे शत्रू!
शिवाय तबलीघी प्रकरणानंतर वेगवेगळ्या अफवा आणि खोट्या बातम्या पसरवणारे संपूर्ण देशाचे आणि मानवतेचे शत्रू असल्याचंही नक्वी यांनी म्हटलंय. काही लोक पूर्वग्रहातून खोट्या बातम्या, अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती फैलावत आहेत. करोनाविरुद्धच्या लढाईत देशाची एकजुटता समोर आली परंतु, ती काही लोकांना पाहता येत नाहीए... त्यामुळेच ते ही एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असे लोक केवळ बोटांवर मोजण्याएवढे आहेत त्यांना समोर आणणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
...हीच 'खुदा'कडे 'दुआ'
रमजान महिन्यात कोणताही मुसलमान मशिदीपासून दूर राहू शकत नाही. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगातील आणि भारतातील उलेमा तसंच संघटनांनी या पवित्र महिन्यात मशिद किंवा इतर धार्मिक - सार्वजनिक स्थळांवर नमाज आणि इफ्तारचं आयोजन न करण्याचा निर्णय घेतलाय, ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला 'खुदा'कडे ही 'दुआ' करायला हवी की आपला देश आणि संपूर्ण जग लवकरच या कठिण परिस्थितीतून बाहेर पडावं, अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.